Marathi Balbharati Kavita lyrics for sixth standard standard (2006)
खाली दिलेल्या कविता महाराष्ट्र शासनाच्या बालभारती मराठी पुस्तक इयत्ता sahavichya आहेत ज्या २००६ साली अभ्यासक्रमाचा भाग होत्या.आपण त्यांचा आस्वाद घ्यावा आणि आठवणींमध्ये गुंगून जावे–sahavichya kavita balbharati
खरा धर्म
साने गुरुजी
खरा तो एकचि धर्म
जगाला प्रेम अर्पावे
जगी जे हीं अतिपतीत
जगी हे दीन पददलित
तया जाऊन उठवावे
जगाला प्रेम अर्पावे
जयांना कोणी ना जगती
सदा जे अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे
जगाला प्रेम अर्पावे
सदा जे आर्त अतिविकल
जयांना गांजिती सकल
तया जाऊन हसवावे
जगाला प्रेम अर्पावे
कुणा ना व्यर्थ शिणवावे
कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्ता बंधू मानावे
जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी
तयाला सर्व हि प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे
जगाला प्रेम अर्पावे
असे जे आपणापाशी
असे जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे
जगाला प्रेम अर्पावे
मायबोली
-सुरेश भट
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धान्य ऐकतो मराठी
धर्म पंथ जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी
आमुच्या रंगारगात रंगते मराठी
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फ़ुलाफ़ुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुतालात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी
येथल्या नभामधू वर्षते मराठी
येथल्या पिकांमधुन डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी
पाखरांची शाळा
ग ह पाटील
पाखरांची शाळा भरे पिंपळावरती
चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती
उतरते ऊन जाते टळूनी दुपार
पारावार जसा यांचा भरतो बाजार
बाराखड्या काय आई घोकतो अंगणी
उजळणी म्हणती काय जमून रंगणी
तारेवर झोके घेती बसुनी रांगेत
भुर्रकन इथे तिथे उडती मौजेत
खेळकर किती नको कराया अभ्यास
परीक्षेत का न आई व्हायची नापास
पावसाळ्यातही शाळा आमुची न गळे
गळकी ग शाळा यांची भिजती सगळे
रविवारी सणावारी आमुच्यासारखी
नाही याना सुटी भली मोडलीय खोड कि
यांच्याहून आम्ही आई शहाणे नव्हे का?
गप्पा शाळेमधीं काढी धरतो न हेका
होतो पास आम्ही देती डीपोटी बक्षीस
मौज काय सांगू मिळे सुट्टीही शाळेस
–—
हिम्मत द्या थोडी
-अशोक कौतिक कोळी
नका नका मला
देऊ नका खाऊ
वैरी पावसाने नेला माझा भाऊ
महापुरामध्ये घरदार गेलं
जुलमी पावसानं दप्तराची नेलं
भांडी कुंडी माझी
खेळणी वाहिली
लाडकी बाहुली जाताना पाहिली
हिम्मत द्या थोडी
उसळू द्या रक्त
पैसाबिसा नको
दप्तर द्या फक्त
—-
बाभुळझाड
-वसंत बापट
अस्सल लाकूड भक्कम गाठ
ताठर कान टॅन्क पाठ
वारा खात गार खात
बाभुळझाड उभेच आहे
देह फुटले बारा फाटे
अंगावरचे पिकले काटे
आभाळात खुपसून बोटे
बाभुळझाड उभेच आहे
अंगावरची लवलव मिटली
माथ्यावरची हळद विटली
छाताडाची धलपी फुटली
बाभूळझाड उभेच आहे
जगले आहे जगते आहे
काकुळतीने बघते आहे
खांद्यावरती सुताराचे
घरटे घेऊन उभेच आहे
—-
ऋण
श्री डी इनामदार
तुझ्या शेतात राबून
माझी सारली हयात
नको करून हेटाळणी
आता उत्तर वयात
नाही राजा ओढवत
चार पाऊले नांगर
नको बोलूस वंगाळ
नको म्हणूस डनगर
माझ्या ऐन उमेदीत
माझी गायीलीस ओवी
नको चाबकासारखी
आता फाटकारू शिवी
माझा घालवाया शीण
तेव्हा चारलास गूळ
कधी घातलीस झूल
कधी घातलीस माळ
अशा गोड आठवणी
त्यांचे करीत रवंथ
मला मरण येऊ दे
तुझे कुशल चिंतीत
मेल्यावर तुझे ठायी
पुन्हा एकदा रुजू दे
माझ्या कातड्याचे जोडे
तुझ्या पायात वाजू दे
—-
भोवरा
-के ना डांगे
भोवरा फिरे गरागरा पहा हा जरा
विसावा नाही विसावा नाही
त्या कितीही फिरवा थकवा येई न काही
खिळ्याचे टोक तयावर झोक पाहुनी रोख
कसा सांभाळी कसा सांभाळी
शाबास भोवर्या, कमाल केलीस वेळी
नाचतो उभा राहतो आहे डोलतो
स्तब्ध कधी राही संबंध कधी राही
मग असे वाटते मुळी तो फिरतच नाही
गुंगणे कोण पण जाणे तयाचे गाणे
जसा कि भुंगा
करी गुणगुण आपल्याशीच घालत पिंगा
आकार , मनोहर फार अशी हाही आर
रंग किती नामी रंग किती नामी
तो खिशात घालून शाळेतही नेतो मी
किती तरी लोभ त्यावरी
पहा तर करी
आसा फिरवितो तसा फिरवितो
वरच्यावर फिरून हातावर तो घेतो
—-
पाखरबोली
कल्याण इनामदार
चिमणी ला बोलले कावळोबा काळे
चिऊताई आपली हुशार्यात बाले
खूप खूप त्यांना कळतंय जग
आपणच अडाणी राहिलोत बघ
नुसती कावकाव चिवचिव करून
डोळ्यातलं पाणी ठेवलाय धरून
शेणाचं मेणाचं घरपण जपत
सगळं आयुष्य काढला खपत
माणसासारखा तुझ्याही मुलाने कालच मोबाइलला घेतलाय म्हणे
माझाही काळ उजळू लागलंय संगणकावरती जाऊन आलंय
पंखात वारं भरलाय गडे
पिढीच्या पिढी गेलीये पुढे
कशाला आपण ओढायचे पाय
घेतील भरारी खातील साय
तारण्याताठ्या चोचीला चिऊ
चांगले दिवस लागतील येऊ
तरीही उगाच वाटतंय बाई
राहतील ना शब्द बाबा अन आई
—-
निरोप
-पद्मा गोळे
बाळ चालला रणा
घर बांधिते तोरण
पंचप्राणांच्या ज्योतींनी
तुझे करिते औक्षण
याचविक्रमी बाहूंनी
स्वतंत्रता राखायची
खांद्यावरती या विसावे
शांती उद्याच्या जगाची
म्हणुनिया माझ्या डोळा
नाही थेंबही दुःखाचा
मी हि महाराष्ट्र कन्या धर्म जाणते वीराचा
नाही एकही हुंदका मुखवटे काढणार
मी लावूनी ठेविली
तुझ्या तलावारीस धार
अशुभाची सावलीही नाही पडणार येथे
अरे मीही सांगते ना जिजा लक्ष्मीशी नाते
तुझ्या शास्त्रांना अस्त्रांना
शक्ती देईल भवानी
शिवरायांचे स्वरूप
आठवावे रणांगणी
धान्याकरी माझी कूस
येई विजयी होऊन
पुन्हा माझ्या हाताने
दूधभात भरवीन